धुळे दर्पण न्यूज :- शहरातील साक्री रोडवरील प्रतिष्ठित नोकरदार वसाहतीतील एका अपार्टमेंटमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी बनावट दारू निर्मितीचा धंदा सुरु असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने याठिकाणी छापा टाकून सुमारे ३ लाख ३९ हजार ७२५ रुपयांचा बनावट दारू व साहित्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी जेतेंद्र शेवाराम टेकवाणी (वय ४३) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
पॉश अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर कारभार
साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोर असलेल्या अरुणकुमार वैद्य नगर येथील प्लॉट क्रमांक ५४ मधील गणराज अपार्टमेंटच्या ६ नंबर फ्लॅटमध्ये हा बेकायदेशीर कारभार सुरु होता. संशयित आरोपी जेतेंद्र टेकवाणी येथे वास्तव्यास असून, त्याच फ्लॅटमध्ये देशी व विदेशी बनावट दारू तयार करून ती चोरट्या मार्गाने खुल्या बाजारात विक्री करत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली.
![]() |
| - Advertisement - |
गुप्त माहितीच्या आधारे छापा
ही माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १ जुलै रोजी अचानक छापा टाकत सदर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर बनावट दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले. या छाप्यात देशी, विदेशी दारूच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल्स, सीलबंद झाकणं, इतर रासायनिक साहित्य असा एकूण ३ लाख ३९ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाई
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कलम ६५ (ब, क, ड, ई, फ), ८१, ८३, ९०, १०८ नुसार टेकवाणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कारवाईचे पथक
ही कारवाई निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, निरीक्षक आर. आर. धनवटे, अनिल निकुंभे, जितेंद्र फुलपगारे, मयुर मोरे, बाळकृष्ण सोनवणे, मनोज धुळेकर, कल्पेश शेलार, दारासिंग पावरा, गौरव सपके, नितीन पाटील व व्ही. बी. नाहिदे यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
अवैध मद्यनिर्मिती, विक्री वा वाहतूक यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना योग्य ते बक्षीसही दिले जाईल, असे आश्वासन निरीक्षक हिप्परगेकर यांनी दिले आहे.


