धुळे दर्पण न्यूज :- शहरालगत लळिंग पासून चितोड, रावेर, जुन्नेर, नकाणे, हरण्यामाळ, सांजोरी या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती, डबर आदी गौण खनिजांचे अवैधरित्या उत्खनन होत असून, महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा महोत्सव सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा गटाने केला आहे. प्रशासनाने पुरावे दिल्यानंतरही अद्याप कारवाई न झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर तंबू ठोकून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लळिंग-एमआयडीसी, नकाणे, हरण्यामाळ, रावेर, जुन्नेर, दह्याने, बह्याने, सांजोरी या संपूर्ण डोंगराळ पट्ट्यात रात्रीच्या वेळी शेकडो हायवा वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर मुरूम व इतर गौण खनिजांची चोरी होत आहे. या वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा भरधाव वेग व मुजोरीमुळे नागरिकांचे तसेच महसूल कर्मचाऱ्यांचे प्राण धोक्यात आले आहेत.

- Advertisement -

  निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, धुळे शहराच्या चारही बाजूंसह राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी ही वाहतूक सुरू असते. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात नकाणे तलाव परिसरातील टेकड्या अक्षरशः साफ करण्यात आल्या आहेत. काही ठेकेदार हे खनिज राष्ट्रीय महामार्गाच्या भराव कामासाठी नेत असल्याचे दाखवत आहेत, परंतु प्रत्यक्षात हा शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या रॉयल्टीचा अपहार आहे.

  महसूल अधिकाऱ्यांचे कथित हात ओले झाल्यानेच हा सर्व प्रकार होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदार, तलाठी, सर्कल अधिकारी हे फक्त कागदोपत्री कारवाई करून डोळेझाक करीत आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले. धुळे शहरालगतच्या टेकड्यांमुळे तयार झालेल्या निसर्गरम्य इको सिस्टीमला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर, पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींची वावराची जागा नष्ट केली जात आहे.

  परवाच्या दिवशी जिल्हाधिकारी संभाजीनगरकडे जात असताना त्यांनी स्वतः एका हायवाला पकडले, परंतु वाहनचालकांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी मुजोरी केली. हीच परिस्थिती सामान्य नागरिकांना व महसूल कर्मचाऱ्यांना सामोरे जावी लागत आहे. याशिवाय, ले-आउट भरावाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर टेकड्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, तर काहीजण नदी, नाले व खड्ड्यांमध्ये अवैधपणे हा माल भरून नव्याने जमिनी तयार करीत आहेत.

- Advertisement -

  या सर्व प्रकरणाची संपूर्ण माहिती व रेकॉर्डिंग शिवसेना उबाठा कडे उपलब्ध असून, संबंधित ठेकेदार, त्यांच्या संरक्षक महसूल अधिकारी आणि शहरातील गौण खनिजाचे डेपो कुठे आहेत, याची माहिती नाशिक विभागीय महसूल आयुक्तांकडे दिली जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच, प्रशासनाने आठ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई न केल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  या वेळी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करणकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाने, निंबा मराठे, सुनील पाटील, आन्ना फुलपगारे, आनंद जावडेकर, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, आबा हरळ, अजय चौधरी, सागर निकम, ईश्तियाक अंसारी, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, प्रदिप बडगुजर, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -