‘गुलमोहर’ प्रकरणी तब्बल ५५ दिवसांनी पालकमंत्र्यांचे मौनभंग; अनिल गोटेंचे सडेतोड सवाल


धुळे दर्पण न्यूज :- धुळेतील बहुचर्चित ‘गुलमोहर’ प्रकरण प्रकरणाला ५५ दिवस उलटल्यानंतर अखेर जिल्ह्याचे पालकमंत्री बोलले; मात्र त्यांच्या उत्तरांवर शिवसेना उबाठाचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी थेट आणि सडेतोड प्रश्नांची सरबत्ती करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

पालकमंत्र्यांच्या ‘चोराच्या मनात चांदणे’ म्हणीचा उल्लेख पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले की, गुलमोहर विश्रामगृहात मोठी रक्कम सापडल्याने ते मुद्दामच तिकडे गेले नाहीत, कारण “चोर के दाढी मे तीनका” किंवा मराठीत “चोराच्या मनात चांदणे” असेच होते. यावर गोटे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर प्रकरण एवढे गंभीर होते, तर तब्बल ५५ दिवस पालकमंत्र्यांच्या तोंडातून एक शब्द का निघाला नाही?

- Advertisement -

गंभीर गुन्हा का दाखल झाला नाही? गोटे यांनी विचारले की, पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी, एवढेच का? पालकमंत्र्यांना एवढीही जाणीव नाही का की, प्रकरण गंभीर असल्याने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची गरज आहे? त्यांनी असा आरोपही केला की, जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश देऊनदेखील त्यांनी गंभीर गुन्हा का दाखल केला नाही?

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

‘गोलमाल’ प्रकरणाची कथित माहिती गोटे यांच्या म्हणण्यानुसार, गुलमोहर शासकीय विश्रामगृहात १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये नजराना (लाच) देण्यासाठी जमा करण्यात आले होते. हे पैसे विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत १५ कोटी रुपयांच्या उद्दिष्टातील एक भाग होते. यात धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या आमदारांसाठी प्रत्येकी २० लाख रुपये देण्याचा कथित कार्यक्रम होता, तर निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांच्या कार्यालयाला ‘वॉररूम’ म्हणून वापरण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

माजी आमदाराचा मोर्चा व पोलिसांची कारवाई माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकारांसह गुलमोहरकडे मोर्चा वळवून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. तसेच गृह खात्याचे वरिष्ठ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अखेर रात्री उशिरा अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक किशोर काळे घटनास्थळी दाखल झाले आणि इलेक्ट्रिक कटर, नोटा मोजण्याचे मशीन घेऊन त्यांनी रोख रक्कम जप्त केली.

अदखलपात्र गुन्ह्याचा प्रकार या घटनेनंतरही तब्बल १० दिवसांनी म्हणजे ३१ मे रोजी मुंबई पोलीस अ‍ॅक्ट १२४ अन्वये फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अनिल गोटे यांनी २० जून रोजी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, मनी लॉन्ड्रिंग आणि भारतीय न्याय संहिता (माजी आयपीसी) अंतर्गत कलम ३०८ खंडणी प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

सरकारी वकीलावरही सवाल गोटेंनी विचारले की, सरकारी वकील देवेंद्र तवर हे पालकमंत्र्यांचे नातेवाईक असून त्यांनी आरोपीची बाजूच का मांडली? तसेच २१ मे ते ३१ मे या कालावधीत गुन्हा दाखल न करण्याचे आदेश तुमचेच होते का? न्यायालयाने आदेश देऊनही पोलिसांनी १५ दिवस तो आदेश का पाळला नाही? याचीही उत्तरे त्यांनी मागितली.

“आत्ताच तुमची वाचा का बंद?” – गोटेंचा टोला गुलमोहर प्रकरणावर देशातील सर्व प्रसिद्ध माध्यमांनी दखल घेतल्यानंतरही पालकमंत्र्यांनी एवढा काळ मौन का पाळले? एरवी तुमचा व तुमच्या सहकाऱ्यांचा वाचाळपणा दिसतो, मग आत्ताच का शांत? असा सवाल करत अनिल गोटे यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम