शिवसेना उबाठा वतीने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी


धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालय पावसाळ्यात दरवर्षीच तलावाचे स्वरूप धारण करत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना, त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांना तसेच येथे कार्यरत डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अगदी हलका पाऊस पडला तरी अपघात विभाग, एक्स-रे विभाग, सिटी स्कॅन विभाग, जनरल ओपीडी, सिव्हिल सर्जन कार्यालय, सर्जरी विभाग, स्त्री रोग विभाग या ठिकाणी पाणी साचते. परिणामी रुग्णांना व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच या ठिकाणी यावे लागते.

या रुग्णालय परिसरातील ड्रेनेज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णालय परिसरात साक्री रोड व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडूनही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर आत येते. विशेष म्हणजे या रुग्णालयालगत असलेल्या कयुमाईन क्लबजवळील नाल्यांतून हे पाणी उतारानुसार अपघात विभागासमोरून बाफना शाळेच्या भिंतीलगत फ्लायओव्हर ब्रिजखालून कमलाबाई शाळेजवळ पोहोचते. पुढे हे पाणी गरुड कॉम्प्लेक्सजवळील ड्रेनेज लाईनमधून जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील ब्रिटिशकालीन भूमिगत गटारांमध्ये मिळते.

- Advertisement -

मात्र ही संपूर्ण ड्रेनेज लाईन – जिल्हा रुग्णालय ते बाफना शाळा, बाफना शाळा ते कमलाबाई शाळा, कमलाबाई शाळा ते गरुड कॉम्प्लेक्स – कायमस्वरूपी चोकअप असल्याने विद्यार्थ्यांना, रुग्णालयातील रुग्णांना आणि नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

सध्या जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणच्या ड्रेनेजचे काम देखील तातडीने हाती घेऊन रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर्स व रुग्णांना दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना उबाठा वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठी शिवसेना उबाठा वतीने जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, क्षेत्र प्रमुख भरत मोरे, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, केतन भामरे, माहद गवळी, तेजस सपकाळ आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.

- Advertisement -

यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या समस्येची तातडीने दखल घेऊन जलद गतीने उपाययोजना व्हाव्यात, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम