धुळे दर्पण न्यूज :- धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भवनाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या इमारतीत शेतकऱ्यांना थांबण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी या इमारतीच्या दुरुस्ती अथवा नव्याने शेतकरी भवन उभारण्यासाठी बाजार समितीने तात्काळ प्रस्ताव पाठवावा, अशी स्पष्ट ग्वाही दिली. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावरून ३ ते ४ कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शनिवारी, ५ जुलै रोजी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना आणि महिला कामगार संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभात आमदार अग्रवाल बोलत होते. या कार्यक्रमात बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती यशवंत खैरनार, उपसभापती नानासाहेब पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, संचालक भागवत चिळकर, महादेव परदेशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शेतकरी भवनात कामगारांसाठी स्वतंत्र सभागृहाची मागणी
  आ. अग्रवाल यांनी यावेळी सूचित केले की, शेतकरी भवनाच्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर कामगारांच्या बैठकीसाठी स्वतंत्र सभागृहाची सुविधाही असावी. यासाठी आवश्यक त्या सविस्तर प्रस्तावांची बाजार समितीने तयारी करून सादर करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कामगार भवनासाठी स्वतंत्र निधीचा पाठपुरावा
  यावेळी आ. अग्रवाल यांनी हमाल व मापाडी कामगारांसाठी स्वतंत्र ‘कामगार भवन’ उभारणीसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. याबाबत कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर व भागवत चिळकर यांनी तातडीने प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी सूचना त्यांनी दिली. कामगारांच्या सध्याच्या अडचणी आणि समस्या विधानभवनाच्या अधिवेशनात मांडल्या जातील, असा शब्दही त्यांनी दिला.
- Advertisement -

सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
  कामगारांसाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत सुमारे ४५ ते ४६ योजना सुरु आहेत. या योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रे समाजकल्याण व कामगार विभागाकडे सादर करून पात्र लाभ मिळवावेत, असे आवाहनही आ. अग्रवाल यांनी यावेळी केले. कोणतीही अडचण असल्यास संपर्क साधावा, त्या सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेईन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
  धुळे शहराच्या औद्योगिक, पर्यावरणीय आणि सामाजिक विकासासाठी शासनस्तरावर विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीसाठी रावेर परिसरात दोन हजार एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच येथे साडे आठ हजार कोटी रुपयांचे औद्योगिक गुंतवणूक प्रकल्प उभे राहतील आणि हजारो युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.

  तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत सुरत बायपास परिसरात लवकरच दहा हजार वृक्षांची रोपवाटिका उभारण्यात येणार असून, ‘अशोक वाटिका’ नावाने हे प्रकल्प साकारले जात आहे. त्यामुळे पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही शहरात सकारात्मक बदल घडविला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -