![]() |
| - Advertisement - |
फारुक शाह यांचा जनसंपर्क आणि राजकीय अनुभव मोठा असून, त्यांनी याआधीही विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. मागील निवडणुकीत त्यांना तब्बल ७२ हजार मते मिळाली होती, तर विजयी ठरलेल्या निवडणुकीत त्यांना सुमारे ४६ हजार मतं मिळाली होती. त्यामुळेच त्यांचा राजकीय प्रभाव अजूनही कायम आहे, असं मानलं जातं.
विशेष म्हणजे फारुक शाह यांच्या विचारधारेचा प्रभाव हिंदू बहुल वसाहतींपर्यंत पोहोचलेला आहे. फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारधारेशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रवेशामुळे केवळ मुस्लिम मतदारच नव्हे, तर इतर मागासवर्गीय, दलित आणि प्रगतिशील विचारांच्या मतदारांमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
![]() |
| - Advertisement - |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील फारुक शाह यांचं मनापासून स्वागत केलं आहे. पक्षाच्या धुळे शहरातील संघटनात्मक बांधणीला त्यांचा अनुभव नक्कीच बळकटी देईल, असं मानलं जातं. धुळे महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत देखील फारुक शाह यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, फारुक शाह यांच्या प्रवेशामुळे धुळे शहरातील आगामी निवडणूक लढती अधिक चुरशीच्या आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही वर्षांत त्यांनी मतदारसंघात केलेल्या कामामुळे आणि मतदारांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे, विरोधकांच्या गणितात बदल होऊ शकतो.
एकूणच, धुळे शहराच्या राजकारणाला नवा वेग देणाऱ्या या प्रवेश सोहळ्याने अनेकांना आगामी निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण केली आहे. आता फारुक शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी वाटचाल कशी असेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


