धुळे दर्पण न्यूज :- धुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा बिगुल वाजला असून, प्रशासनाने नियोजनाच्या हालचालींना गती दिली आहे. शहरातील मतदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावेळी तब्बल १०० नवीन मतदान केंद्रांची वाढ होणार आहे. त्यामुळे ४५० मतदान केंद्रांऐवजी एकूण सुमारे ५५० मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोमवारी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या महासभेत निवडणूक तयारीचा प्राथमिक आढावा घेण्यात आला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींवर चर्चा केली. यामध्ये संभाव्य खर्चाचा अंदाज, कर्मचारी वाढ, नवीन केंद्रासाठी जागा निश्चिती, मतदार यादीतील वाढ आदी मुद्द्यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा सुमारे १ लाख नवीन मतदारांची वाढ होण्याची शक्यता असल्याने मतदारांची गर्दी टाळण्यासाठी अधिक केंद्रांची आवश्यकता भासत आहे.

- Advertisement -

महापालिकेने सुधारित आकृतिबंध तयार करून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेच्या २,२७४ पदांच्या आकृतिबंधामध्ये सुधारणा करून २,३०३ नवीन पदांची वाढ सुचवली असून, त्यामुळे एकूण पदांची संख्या ४,५५७ होणार आहे. या नव्या आकृतिबंधात तांत्रिक पदांच्या वाढीसह विभागनिहाय गरजांनुसार कर्मचारी नेमणूक करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सेवाप्रवेश नियमांच्याही सुधारित मंजुरीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

निवडणुकीच्या नियोजनासाठी मतदान केंद्रे, साउंड सिस्टिम, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन, मतदार जागृतीसाठी फलक, वाहन भाडे आदींसाठी निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच, नवीन केंद्रांसाठी शाळा किंवा अन्य सार्वजनिक इमारती शोधल्या जात आहेत.

महासभेनंतर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी खर्चास कार्योत्तर मंजुरीचा विषय आला असता संबंधित विभागाचे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिळालेल्या निधीतून सुदर्शन कॉलनीत सरस्वती उद्यान, सुलेखन उद्यान तसेच श्रीसंत रोहिदास गार्डनमध्ये खेळणी बसवून तेथे सुंदर उद्यान विकसित केले जाणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध तयारीचे काम वेगाने सुरू असून, मतदारांना सुलभ मतदानाचा अनुभव देण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी काही आठवड्यांत विभागनिहाय तपासणी करून अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. महापालिकेच्या या नियोजनामुळे शहरातील लोकशाही उत्सव अधिक सुचारू आणि नियोजित पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम