धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र राज्यातील परिचारिका संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी दूर करण्यासाठी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १५ व १६ जुलै २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे व निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर १७ जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन होणार असून, मागण्या न मानल्यास १८ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
२०१७ साली राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गठीत केलेल्या बक्षी समितीसमोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (मुख्यालय लातूर) राज्यातील सर्व पदांच्या वेतन तफावती दूर करण्याची ठोस मागणी केली होती. मात्र, बक्षी समितीने प्रसिद्ध केलेल्या खंड २ मध्ये अधिपरिचारिका, परिसेविका, पाठयनिदर्शिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिका या पदांवरील अन्याय दूर झाला नाही. त्यामुळे संघटनेने न्यायालयात याबाबत दाद मागितली.
![]() |
| - Advertisement - |
पुढे, विविध संघटनांच्या न्यायालयीन प्रकरणामुळे राज्य शासनाने मा. मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती गठीत केली. परंतु या समितीनेही परिचारिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, ज्यामुळे परिचारिका वर्गात तीव्र नाराजी पसरली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाने दि. ६ जून २०२५ रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयाचा राज्यभरातून प्रचंड विरोध झाला आणि अखेर शासनाला तो निर्णय मागे घ्यावा लागला. संघटनेची ठाम भूमिका आहे की, राज्यातील वाढत्या लोकसंख्येनुसार १०० टक्के पद निर्मिती करावी, तसेच १०० टक्के पदोन्नतीची अंमलबजावणी करावी. परंतु या मागण्यांकडे शासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिचारिका संवर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याच पार्श्वभूमीवर धुळे येथील शासन मान्य महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा - श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या शाखेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. अध्यक्ष दिपक सर, उपाध्यक्षा पूनम मॅडम, सचिव पंकज सर, तसेच हेमंत देवरे, सनी रोहड़ा, शशिकांत सोनवने, विक्टोरिया पाथरे, जुबेर अली आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी संघटनेच्या वतीने आंदोलनाची माहिती देताना अध्यक्ष दिपक सर यांनी सांगितले की, “राज्य शासनाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास परिचारिका संघटना १८ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यास भाग पाडली जाईल.”
आंदोलनाच्या या कार्यक्रमामुळे वैद्यकीय सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीही संघटनेचा ठाम आग्रह आहे की, अन्याय दूर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल

