धुळे दर्पण न्यूज :- शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य व अंमली पदार्थांची सर्रास विक्री सुरू असून, अनेक अल्पवयीन विद्यार्थी व्यसनाधीन होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनसे विद्यार्थी सेना) धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करत, त्वरित कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मनसे विद्यार्थी सेनेचे माजी उपाध्यक्ष शामक दादाभाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, शहरातील अनेक मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच महाविद्यालयांच्या १०० मीटरच्या परिघात गुटखा, सिगारेट्स, खर्रा, तंबाखू व तत्सम व्यसनमुक्ती करणाऱ्या पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. काही ठिकाणी टपऱ्या, पानटपऱ्या, किराणा दुकाने या व्यसनांचे केंद्रबिंदू बनले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम होत आहे.
![]() |
| - Advertisement - |
शाळांच्या परिसरात अशा विक्रीवर कायद्यानुसार बंदी असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेमुळे अशा बेकायदेशीर व्यवसायांना उत आला आहे. हे केवळ आरोग्याचे नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही गंभीर संकट निर्माण करणारे चित्र आहे, असे मनसे विद्यार्थी सेनेचे म्हणणे आहे.
निवेदनात हेही नमूद करण्यात आले आहे की, शहरातील काही भागांमध्ये अंमली पदार्थांचा (गांजा, ब्राऊन शुगर, इतर ड्रग्ज) वापर आणि विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही घरांतून, बंद गाळ्यांतून आणि लपूनछपून टपऱ्यांतून हे पदार्थ विकले जात असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, फक्त पोलिस यंत्रणांनीच नव्हे तर अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजानेही यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
शामक दादाभाई यांनी प्रशासनाला चार दिवसांची मुदत देत म्हटले आहे की, जर या मुदतीत संबंधित विक्रेत्यांविरोधात ठोस आणि परिणामकारक कारवाई करण्यात आली नाही, तर मनसे विद्यार्थी सेना शहरातील विद्यार्थी व युवकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित परिणामासाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
या निवेदनप्रसंगी मनसेचे राज्य सचिव प्राची कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने, उपाध्यक्ष संध्या पाटील, सतीश पाटील, निलेश गुरव, उज्वला दादाभाई, विजया गुरुबा, विठ्ठल मराठे, राहुल भामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शहरातील युवकांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन आणि संबंधित विभाग कितपत गांभीर्याने लक्ष घालतात, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



