धुळे दर्पण न्यूज :- भारतीय सीमेवर सेवा बजावत असताना चुकून भारतीय हद्द पार करून पाकिस्तानमध्ये गेलेले आणि नंतर चर्चेत आलेले माजी सैनिक चंदू चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, या वेळी कारण वेगळं आहे. धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
परिसरातील अस्वच्छतेविरोधात आंदोलन
चंदू चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या परिसरातील घाणीच्या साम्राज्याविरोधात मनपाकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर त्यांनी मनपा आयुक्तांच्या केबिनबाहेरच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाच्या वेळी अनेक नागरिक उपस्थित राहिले होते, तसेच त्यांनी मनपाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
मनपा कर्मचाऱ्यांकडून मारहाण
या आंदोलनावेळीच मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव आणि कर्मचारी युवराज खरात हे तिथे आले. त्यांनी चंदू चव्हाण यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान चंदू चव्हाण यांना लाथ मारण्यात आल्याचा आणि नंतर जोराचा धक्का देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चंदू चव्हाण यांनी स्वत:च या घटनेचा व्हिडिओ शुट केला असून, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चंदू चव्हाण यांना धक्काबुक्की होताना स्पष्ट दिसत आहे.
![]() |
| - Advertisement - |
“माजी सैनिकाला अशी वागणूक का?”
“मी माझ्या हक्कासाठी आलो होतो. आमच्या परिसरातील कचऱ्याचे डोंगर आणि घाणीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या मांडत होतो. मात्र, मनपाच्या कर्मचाऱ्यांनी मला लाथ मारली आणि बाहेर ढकललं. माजी सैनिक म्हणून एवढी हीन वागणूक मिळावी का?” असा सवाल चंदू चव्हाण यांनी केला आहे.
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
या संपूर्ण प्रकरणावर मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांची काय भूमिका असते, तसेच आरोपी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंदू चव्हाण यांचा पूर्वेतिहास
चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील आहेत. भारतीय लष्करात सेवा देताना 2016 साली त्यांनी चुकून नियंत्रण रेषा ओलांडली होती आणि पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. तब्बल 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या तुरुंगात राहिल्यानंतर भारत सरकारच्या प्रयत्नाने त्यांची सुटका झाली होती. धुळ्यात परतल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत झाले होते. मात्र, त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासूनच चंदू चव्हाण विविध प्रशासकीय मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पुढे काय?
एका माजी सैनिकाला मनपा कार्यालयातच अशा पद्धतीने मारहाण होणे हे गंभीर मानले जात आहे. आता या प्रकरणात पोलिस तपास, मनपाची कारवाई आणि पुढील कायदेशीर पावले काय उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


