धुळे दर्पण न्यूज :- सोलापूर महामार्गावर कसबखेडा येथील चैतन्य हेरिटेजजवळ गुरुवारी दुपारी एक धावती कार अचानक पेटली आणि काही क्षणांतच संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने वाहनचालक वेळेवर बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
छत्रपती संभाजीनगर येथील कुशल वसुदेव लाड (रा. सिडको) आपल्या मारुती AXL (MH21 CA 6655) या कंपनी फिटेड सीएनजी किट लावलेल्या गाडीतून कन्नडकडे निघाले होते. दरम्यान, कसबखेडा परिसरातील चैतन्य हेरिटेजजवळ गाडी चालवत असताना त्यांना जळत्या वस्तूंचा वास येऊ लागला. त्यांनी तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वाहनातून खाली उतरले. मात्र, काही क्षणांतच गाडीने पेट घेतला आणि मोठ्या आगीने गाडीला कवेत घेतले.
![]() |
| - Advertisement - |
वाहनचालक लाड यांनी स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या झिरपे, पोलिस उपनिरीक्षक रमेश सांगळे, रमेश धस, विकास चंदणसे, धरमसिंग बिमरोड, विगडे, शरद डाळवी यांच्यासह पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
या घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनचालकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी तत्परतेने रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली. ही घटना सिल्लेगाव पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
कुशल लाड यांनी सुमारे वर्षभरापूर्वीच ही कंपनी फिटेड सीएनजी किट असलेली मारुती AXL कार खरेदी केली होती. गाडीला विमा देखील वैध आहे. सदर वाहन पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनांवर चालते. घटनेपूर्वी लाड यांनी वडजडी येथील सीएनजी पंपावर गाडीला सीएनजी भरली होती आणि सुमारे १० किलोमीटर अंतर पार केल्यानंतरच गाडीने अचानक पेट घेतला.
![]() |
| - Advertisement - |
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पंचनामा करून पुढील तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकारामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, कंपनी फिटेड सीएनजी गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.



