धुळे दर्पण न्यूज :-  आपल्या अल्पवयीन मुलीचा गेल्या तीन महिन्यांपासून अद्याप शोध लागत नसल्यामुळे आणि आरोपींवर कारवाई होत नसल्याच्या आरोपावरून, धुळे येथील शितल हिलाल पाटील यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस मैदानात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वडिलांसह आत्मदहन करण्याचा इशाराही दिला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शितल पाटील यांनी सांगितले की, त्यांची मुलगी मयुरी हिलाल पाटील (वय १७ वर्षे) ही २ मे २०२५ रोजी शिरपूर तालुक्यातील जोगेश्वरी कॉलनी येथून बेपत्ता झाली. मुलगी शेवटचे महादेव मंदिराजवळ दिसल्याचे साक्षीदार सांगतात. यानंतर त्यांनी तातडीने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तथापि, पोलिसांनी वारंवार भेट देऊनही तपासात कोणतीही गती दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

  त्यांनी ४ मे रोजी प्रथम माहिती अहवाल (FIR क्र. ०२४१/२०२५) नोंदविला. आरोपी म्हणून विश्वजीत युवराज मोरे (रा. गरताड, ता. शिरपूर) याच्यावर संशय व्यक्त केला आहे. यानंतर १६ जून, १९ जुलै आणि इतर अनेक तारखांना त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महिला आयोग, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) शिरपूर तसेच नाशिक विभागातील आयजी व महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे निवेदने दिली. मात्र, आरोपी अद्याप फरार असून अटक झालेली नाही, तसेच मुलीचा शोध लागलेला नाही.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

"मोठ्यांसाठी वेगळी, गरीबांसाठी वेगळी कायद्याची वागणूक"
पत्रकार परिषदेत बोलताना शितल पाटील म्हणाल्या – "मोठ्या लोकांच्या प्रकरणात २४ तासांत अटक होते. पण आम्हा सामान्य गरीब लोकांच्या प्रकरणात तीन महिने झाले तरी तपासात प्रगती नाही. आरोपीचे आई-वडील, नातेवाईक खुलेआम वावरत आहेत, पण पोलिसांनी चौकशी करूनही कारवाई केलेली नाही. हा कायदा फक्त मोठ्यांसाठीच आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

१५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाची धमकी
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जर आरोपीला त्वरित अटक करून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून मुलीचा शोध घेऊन तिला आपल्या ताब्यात देण्यात आला नाही, तर येत्या १५ ऑगस्ट रोजी धुळे पोलीस मैदानावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वडिलांसह आत्मदहन करतील. "आमच्या मुलीच्या शिक्षणाचे व भविष्याचे नुकसान आरोपीमुळे होत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी," अशी त्यांची मागणी आहे.

पोलिसांचा तपास चालू असल्याचा दावा
या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पोलीस सूत्रांनी सांगितले की, मुलीचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत आहे आणि आरोपीचा शोध विविध ठिकाणी घेतला जात आहे.

धुळे जिल्ह्यातील या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -