धुळे दर्पण न्यूज :- धुळे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या मालकीची शाळा क्रमांक ४ आणि ८ तसेच त्यांचे क्रीडांगण, खुली जागा व इमारती येथे भाजीपाला, मासे, मटण विक्रेते आणि फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याच्या मनपा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी एकमुखाने तीव्र हरकत नोंदवली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
सरकार सोशल ग्रुप, धुळेचे अध्यक्ष जावीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, नगर विकास मंत्री, विभागीय आयुक्त नाशिक, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, तसेच मनपा शिक्षण मंडळ प्रशासन यांना लेखी निवेदन सादर करून या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला.
![]() |
| - Advertisement - |
निवेदनात म्हटले आहे की, सी. स. नं. २४६२ वजअ, २४६३, २४६४ या भूखंडांवर असलेली मनपा शाळा क्रमांक ४ व ८ ची इमारत, क्रीडांगण व खुली जागा ही पूर्णतः शैक्षणिक व क्रीडा उपयोगासाठी राखीव असून, येथे दोन बालवाड्या, पाचवी ते आठवीचे वर्ग, मुख्याध्यापक कक्ष, अपंग विद्यार्थ्यांसाठी साधन केंद्र, व्यायामशाळा, तसेच नियमित सभा, सामाजिक कार्यक्रम व विविध शैक्षणिक उपक्रम पार पडतात. ही जागा प्रदूषणमुक्त आणि मुलांच्या खेळ, व्यायाम, व शैक्षणिक विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
स्थानिकांच्या मते, येथे फेरीवाल्यांचे पुनर्वसन, दुकाने किंवा मासे-मटण बाजार सुरू झाल्यास क्रीडांगण नष्ट होईल, शाळकरी मुले खेळण्यापासून वंचित राहतील आणि परिसरात वाहतूककोंडी, घाण, दुर्गंधी व आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील. तसेच या परिसरात धार्मिक स्थळे, शासकीय कार्यालये, जिल्हा कारागृह, तहसील कार्यालय यांसारखी संवेदनशील स्थळे असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
![]() |
| - Advertisement - |
नागरिकांनी प्रशासनास विनंती केली आहे की, शाळा क्रमांक ४ व ८ च्या जागेवर कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन, दुकाने किंवा बाजारपेठ लावण्यास कायमस्वरूपी मनाई करावी आणि मूळ उद्देशानुसारच शैक्षणिक व क्रीडा कार्यासाठीच या जागेचा वापर व्हावा.
या हरकत निवेदनावर जावीद पठाण, इफ्तेखर शेख, जुनेद सैय्यद, आसिफ अन्सारी, अब्रार अन्सारी, मुईन अख्तर अन्सारी, फरुक तेली, सलीम अन्सारी, समद अन्सारी, शकील अन्सारी, साकिब सैय्यद, आसिफ पठाण, इकबाल शेख, अमीर अन्सारी, बंटी शेख यांसह अनेक स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत.
स्थानिकांच्या या तीव्र विरोधानंतर आता प्रशासन या निर्णयावर काय भूमिका घेणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.



