धुळे दर्पण न्यूज :- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या मालकीचे पाच जुने मार्केट सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून, तिथल्या व्यापाऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांनाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर या पाचही मार्केटचे बीओटी (बिल्ट-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्वावर बहुद्देशीय मार्केटमध्ये रूपांतर करण्याची मागणी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या पत्रात आमदार अग्रवाल यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, जुन्या आग्रा रोडवरील पाचकंदील परिसरात महापालिकेच्या मालकीचे जय शंकर मार्केट, शिवाजी मार्केट, लालबहादूर शास्त्री मार्केट, फळ विक्री मार्केट व दाणा बाजार मार्केट अशी पाच जुनी मार्केट आहेत. यामध्ये कापड, भाजी, फळ व धान्य विक्रीची दुकाने आहेत. परंतु सध्या या सर्वच इमारतींची अवस्था अत्यंत खराब असून काही दुकानांच्या संरचना धोकादायक बनल्या आहेत.
या ठिकाणी वारंवार आगीसारख्या दुर्घटना घडत असून, अशा वेळी अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही आत पोहोचणे अशक्य होऊन बसते. परिणामी, व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. ग्राहकही या दुरवस्थेच्या भीतीने मार्केटमध्ये जाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेक भाजीपाला व फळ विक्रेते रस्त्यावरच दुकाने थाटत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि सामाजिक वादांना खतपाणी मिळते.
![]() |
| - Advertisement - |
आमदार अग्रवाल यांनी प्रस्तावित केले आहे की, या पाचही मार्केटचे बीओटी तत्वावर फेरबांधकाम करून ते बहुद्देशीय मार्केटमध्ये रूपांतरित करावे. नवीन बाजारात भाजी, फळ, कापड व धान्य विक्रीसाठी स्वतंत्र विभाग असतील. हे मार्केट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार असल्याने ग्राहकांना सर्व गरजेच्या वस्तू एका ठिकाणी सहज उपलब्ध होतील. यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवसायही वाढतील आणि शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.
या पुनर्बांधणीमुळे रस्त्यावरची बाजारपेठ टळेल, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही आणि नागरी सुव्यवस्था अधिक सुदृढ होईल. शिवाय, नवीन दुकाने तयार झाल्याने अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या सर्व गोष्टींचा विचार करता, महापालिका प्रशासनाने तातडीने पाचकंदील परिसरातील या पाचही मार्केटचे प्रत्यक्ष पाहणी करावी आणि बीओटी तत्वावर त्यांचे बहुद्देशीय मार्केटमध्ये रूपांतर करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी ठाम मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

