धुळे दर्पण न्यूज :- दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत मा. गिडीयन लबाने यांनी आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा. जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-दक्षिण आफ्रिका संबंध वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने व्यापार वृद्धीच्या विविध संधींबाबत सखोल चर्चा झाली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या चर्चेच्या वेळी मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, "भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही देश विकासाच्या वाटेवर अग्रेसर असून, महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस मानले जाते. येथे पर्यटन, खनिज उत्खनन, कृषी प्रक्रिया, औद्योगिक उत्पादन आणि आयटी यांसारख्या अनेक क्षेत्रांत परस्पर सहकार्याच्या अफाट संधी आहेत." त्यांनी यावेळी हेही नमूद केले की, "महाराष्ट्राला दक्षिण आफ्रिकेविषयी नेहमीच आत्मीयता राहिली आहे आणि भविष्यातील संबंध अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे."
![]() |
| - Advertisement - |
दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत मा. गिडीयन लबाने यांनीही आपल्या भाषणात महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, "गांधीजींच्या प्रेरणेतूनच नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य व विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले." त्यांनी हेही नमूद केले की, "भारत आणि महाराष्ट्र कृषी क्षेत्रात आघाडीवर असून, दक्षिण आफ्रिकेला त्या क्षेत्रातील मार्गदर्शन व सहकार्याची अपेक्षा आहे."
या चर्चेच्या निमित्ताने महाराष्ट्र व दक्षिण आफ्रिका यांच्यातील इतिहास, संस्कृती, व्यापार आणि विकासाच्या बाबतीत असलेल्या संबंधांवर नव्या संधींचा प्रकाश टाकण्यात आला. दोन्ही देशांमध्ये भविष्यात खनिज क्षेत्र, कृषी उत्पादने, पर्यटन, वाणिज्य व औद्योगिक गुंतवणूक यामध्ये सहकार्य वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या सदिच्छा भेटीमुळे महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील संबंध आणखी बळकट होतील आणि व्यापार वृद्धीसाठी नवीन अध्याय सुरु होईल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.


