धुळे दर्पण न्यूज :- शहरातील गुन्हेगारी विरोधात निघालेल्या मोर्चानंतर निर्माण झालेल्या तणावातून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन घरात घुसून मारहाण व विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या एकूण १३ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून सतत नजर ठेवली जात आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
प्राप्त माहितीनुसार, ४८ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, फत्तेसिंग भादा व त्याच्या साथीदारांविरोधात शहरात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तक्रारदार महिलेची मुले सहभागी झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून फत्तेसिंग भादा, विशाल निंबा कोळी, तन्वीर पठाण व लोकेश मांगीलाल भोसले यांनी संबंधित महिलेच्या राहत्या घरात घुसून तिच्यावर हात उचलला. केवळ मारहाणच नव्हे, तर तिचा विनयभंग देखील करण्यात आला आणि सोबतच रोख रक्कम लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महिलेसह तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
![]() |
| - Advertisement - |
दुसरीकडे, या घटनेनंतर दुसऱ्या गटातर्फे लोकेश मांगीलाल भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दादू वाकडे, बापू वाकडे, भटू नेरकर, किरण चौधरी, समाधान भामरे, नितीन साळवे, भुरी वाकडे, तेजा सोनार व सोनवणे आडनाव असलेल्या व्यक्तींनी रॉड, धारदार शस्त्रे व काठ्या घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात फत्तेसिंग भादा, विशाल कोळी व इतरांना गंभीर दुखापत झाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
![]() |
| - Advertisement - |
या दोन्ही तक्रारींच्या आधारे मोहाडी पोलिसांनी दोन्ही गटांच्या एकूण १३ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, पोलिस प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, गुन्हेगारी पाश्वभूमीच्या घटना वाढत चालल्याने शहरातील सामाजिक संस्था व नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असून, पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



