धुळे दर्पण न्यूज :- धुळे महापालिकेतर्फे शहरातील विकासकामांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून पुढील महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. वरखेडी रोडवरील कंपोस्ट डेपोमध्ये तब्बल ३०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प (सोलर पार्क) उभारण्यात येणार असून, यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर वीज बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर डेपोची मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता वाढणार आहे.
महापालिकेने याआधीही ‘माझी वसुंधरा अभियान’ राबवत पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत. त्या अभियानाअंतर्गत महापालिकेला राज्यस्तरावरील पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या पुरस्काराच्या रकमेतूनच या सौर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
 |
| - Advertisement - |
५०० किलोवॅट मागणी, ३०० किलोवॅटची निर्मिती
वरखेडी रोडवरील कंपोस्ट डेपोमध्ये सध्या ५० ते ६० टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाते. मात्र, येथे आवश्यक वीज पुरवठ्याची व्यवस्था नसल्यामुळे जनरेटरवरच काम सुरू आहे. सोलर पार्क उभारण्यात आल्यानंतर ३०० किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. डेपोची एकूण वीज मागणी ५०० किलोवॅट असल्याने तेथे त्या क्षमतेचे रोहित्र बसवले जाणार आहे. परिणामी, दिवसाला तब्बल ११० ते १३० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता मिळेल. यामुळे महापालिकेला दरमहा लाखो रुपयांची वीज बचत होणार आहे.
शेडवर सौर पॅनल, शहरात सोलर ट्रीही
कंपोस्ट डेपोमध्ये उभारण्यात आलेल्या शेडवरच सौर पॅनल बसवण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील प्रमुख चौक, उद्याने व पांझरा नदी किनाऱ्यावरील रस्त्यावर सौर ऊर्जेवर चालणारे ‘सोलर ट्री’ उभारण्यात येणार आहेत. या सोलर ट्रीमुळे सुमारे ६० पथदिवे बसवले जातील, जे संपूर्ण रस्त्याला आकर्षक प्रकाशाने उजळवतील.
 |
| - Advertisement - |
महापालिकेची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
महापालिकेने सौर ऊर्जेच्या माध्यमातून शहरातील वीज वापराच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आहे. या प्रकल्पामुळे केवळ आर्थिक बचतच नव्हे, तर पर्यावरणपूरक विकासकामांमध्ये शहराचा पुढाकार अधिक ठळक होणार आहे. सौर प्रकल्प, सोलर ट्री व इतर उपक्रमांमुळे महापालिका सौर ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकत आहे.
या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी पूर्णत्वास गेल्यानंतर शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने मोठा बदल दिसून येईल आणि विकास व पर्यावरण यांचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
 |
| - Advertisement - |