जागा द्या, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा!

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांनी पोलिस आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईविरोधात शुक्रवारी (१ ऑगस्ट) जोरदार मोर्चा काढून, "जागा द्या, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा!" अशा घोषणा देत महापालिकेवर धडक दिली. उपजीविकेची जागा देण्याची मागणी करत या विक्रेत्यांनी कडकडीत विक्री बंद आंदोलन केले. मात्र, महापालिकेने जुन्या आग्रा रोडवरील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अखत्यारित असल्याचे कारण देत परवानगी नाकारली आहे. परिणामी, अंतिम निर्णयाचा चेंडू पीडब्ल्यूडीकडे फेकला गेला असून विक्रेत्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा अनिश्चिततेत लटकला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

संयुक्त कारवाईचा निषेध

  शहरातील जीटीपी स्टॉप (देवपूर) ते पाचकंदील चौक परिसरापर्यंत वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या कारणास्तव भाजी-फळ विक्रेते व हातगाडीधारक व्यावसायिकांवर महापालिका व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने काही दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत विक्रेत्यांचे वजन काटे, साहित्य जप्त केले जात असून, काहीवेळा भाजीपाला रस्त्यावर फेकला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. या कारवाईच्या निषेधार्थ व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव परदेशी यांच्या नेतृत्वाखाली भाजी, फळ विक्रेते आणि इतर हॉकर्सनी मोर्चा काढला.

- Advertisement -

भाजी विक्रेत्यांची मागणी

  विक्रेत्यांनी, तोडगा निघेपर्यंत आग्रा रोडच्या दुतर्फा पांढरे पट्टे मारून दोन टोपल्या ठेवून व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली. 'डाकू, नक्षलवाद्यांचेही पुनर्वसन होते; मग आम्ही गरीब विक्रेते चरितार्थासाठी जागा मागतो, तर त्यात गैर काय?' असा सवाल करत त्यांनी आपली बाजू मांडली. जागेविषयी तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही श्री. परदेशी यांनी दिला.

मोर्चाची ठळक वैशिष्ट्ये

  मोर्चाची सुरुवात आग्रा रोडवरील श्री खंडेराव महाराज मंदिर येथे महाआरतीनंतर झाली. त्यानंतर पारोळा रोडमार्गे महापालिकेच्या नव्या इमारतीसमोर मोर्चेकऱ्यांनी पंधरा मिनिटांचा ठिय्या दिला आणि "जागा द्या, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा!" अशा जोरदार घोषणा दिल्या.

मोर्चेकऱ्यांचा आरोप

  मोर्चेकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी देवपूरमधील दत्तमंदिर चौकात महिला विक्रेत्याला मारहाण करून भाजी रस्त्यावर फेकल्याचा आरोप केला. मोर्चात मायादेवी परदेशी, भिकन वराडे, उमेश महाजन, प्रमोद चौधरी, सागर वाघ, पांडुरंग माळी, देवीदास बडगुजर, जीतू चौधरी, सुनील फुलपगारे, ईश्वर माळी, दीपक धात्रक, पंढरीनाथ वाघ, अनिता मिस्तरी, शरद चौधरी, जमिल अहमद, ईलियास खाटीक, विजय नागमोती, शामू परदेशी, योगेश परदेशी, शाहरूख शेख, बळवंत चव्हाण, प्रमोद सोनार, लक्ष्मण माळी व इतर विक्रेते सहभागी झाले. या वेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, चाळीसगाव रोडचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी बंदोबस्त ठेवला.

- Advertisement -

आयुक्तांची भूमिका आणि बैठक

  मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील म्हणाल्या, “आमदार तुमचे आहेत, त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.” भाजी विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा काढला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच, पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे भाजी विक्रेत्यांचे वजन काटे व साहित्य जप्त केले जाणार नाही, असे आश्वासन दिले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पुढील पाऊल काय?

  पाचकंदील चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडी, महिलांची छेडछाड अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू झाली असली, तरी पुनर्वसनाची योग्य सोय न करता थेट हटवणे अन्यायकारक असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आता सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक होईपर्यंत विक्रेत्यांचे आंदोलन थांबते का, की आणखी तीव्र रूप घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -