धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात गोवर या संसर्गजन्य आजाराची साथ पसरल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आश्रमशाळेतून या आजाराचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त होत असून, मागील १३ दिवसांत धुळे जिल्ह्यातील १०९ बालकांना गोवरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

३९ हजार विद्यार्थ्यांची तपासणी

  साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून आश्रमशाळा, वसतिगृह व विविध शैक्षणिक संस्थांमधील एकूण ३८ हजार ९५७ बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १०९ बालकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. जिल्ह्यात ३१ पथके तपासणीसाठी कार्यान्वित करण्यात आली होती. प्रत्येक पथकात दोन डॉक्टर व दोन सहाय्यक (एक महिला व एक पुरुष) यांचा समावेश होता.

- Advertisement -

तालुकानिहाय तपासणी व लागण

  तपासणी दरम्यान सर्वाधिक रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळले. एकूण १६ हजार ५७२ विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यापैकी ४९ मुलांना गोवरची लागण झाल्याचे आढळले. साक्री तालुक्यात १८ हजार १५५ मुलांची तपासणी झाली असून त्यापैकी ४८ बालकांना संसर्ग झाला. धुळे तालुक्यात ७ आणि शिंदखेडा तालुक्यात ५ बालकांना गोवर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

शाळा बंद, विद्यार्थी गावी परतल्याने फैलाव

  एरंडोल येथील आश्रमशाळेत गोवरची लक्षणे दिसल्यानंतर शाळा तातडीने बंद करण्यात आली. त्यामुळे संबंधित विद्यार्थी आपल्या गावी परतले आणि त्यातून धुळे जिल्ह्यात या साथीचा प्रसार झाला.

नियंत्रणासाठी पुढाकार

  धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांनी सांगितले की, "गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने सतत देखरेख व तपासणी सुरू आहे. आरबीएसकेचे (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान) पथक सातत्याने तपासणी करत आहे. उपचारानंतर बऱ्याच बालकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे."

- Advertisement -

आरोग्य विभाग सतर्क

  नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील तपासणी मोहिमेबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, पुढील काळात अशा प्रकारच्या साथीवर अधिक काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

  👉 सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पालकांनी आपल्या मुलांमध्ये ताप, अंगावर लाल पुरळ किंवा गोवरची अन्य लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -