धुळे दर्पण न्यूज :- मुंबई – स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील काही महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मांसविक्री आणि जनावरांची कत्तल यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका, मालेगाव महापालिका आणि नागपूर महापालिका यांचा समावेश आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी रात्री १२ वाजल्यापासून ते १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जनावरांची कत्तल, तसेच मांस विक्रीवर संपूर्ण बंदी राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही महापालिकांनी दिला आहे.

  या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न असलेल्या दिवशी अशी बंदी घालणे योग्य ठरते. उदाहरणार्थ, आषाढी एकादशी, महाशिवरात्री, महावीर जयंती अशा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या दिवसांवर मांसविक्री बंद ठेवली जाते. परंतु, स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण आहे, त्यावेळी अशा प्रकारची बंदी घालणे योग्य नाही.”

- Advertisement -

  अजित पवार पुढे म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली आहेत. आपल्या समाजात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे लोक राहतात. कोकणात तर साधी भाजी करतानाही सुकट, बोंबील टाकले जाते, कारण तो त्यांचा परंपरागत आहार आहे. अशा गोष्टींवर बंदी घालणे उचित नाही. महाराष्ट्र दिन, २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टला अशा प्रकारच्या बंदीची सक्ती केली तर ती लोकांना अवघड वाटेल. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी एखादा सण किंवा कार्यक्रम असताना बकऱ्याची कत्तल करून साजरा केला जातो. आदिवासी समाजाचा आहार देखील प्रामुख्याने मांसाहारावर आधारित आहे.”

  त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “भावना आणि श्रद्धा यांचा मान राखणे महत्त्वाचे आहे, पण त्याचा संदर्भ धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरेशी असावा. राष्ट्रीय सणाच्या दिवशी अशा बंदीचा आधार फारसा योग्य नाही.”

राधाकृष्ण विखे पाटलांवरील गैरसमज
  दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या एका वक्तव्याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यांना दिलेल्या मदतीबाबत अभिनंदनाच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसल्याने विखे पाटलांनी टीका केली होती. यावर पवार म्हणाले, “मला कारखान्याच्या वतीने जाहिरातबाजी करायची होती, पण मी स्पष्टपणे नकार दिला. कारखान्याचा पैसा शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी वापरला पाहिजे. इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने कारखानदारीला मदत झाली आहे, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाते.”

पालकमंत्रीपदावरील नाराजीबाबत प्रतिक्रिया
  रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले नाराज असल्याच्या चर्चांवरही अजित पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “कोणाला पालकमंत्री करायचे, कोणाला मंत्रिपद द्यायचे हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पालकमंत्री नसले तरी जिल्ह्याचे कामकाज अडणार नाही.”


धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -