धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील राजकारणाला सध्या वेगळीच कलाटणी मिळताना दिसत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, याच पार्श्वभूमीवर १६ ऑगस्ट २०२५ रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचा एक भव्य मेळावा शहरात आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते व माजी खासदार इम्तियाज जलील स्वतः धुळ्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या मेळाव्याच्या माध्यमातून धुळे शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. विशेषतः अल्पसंख्याक व मुस्लिमबहुल भागातील राजकीय नेत्यांचा सहभाग या पक्षप्रवेशात होणार असून, त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वीच शहरात नवा राजकीय समीकरणांचा उदय होण्याची शक्यता आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
फारुक शाह यांचा पक्षत्याग आणि त्याचे पडसाद
एमआयएमचे माजी आमदार डॉ. फारूक शाह यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या सोबतच अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, या घटनाक्रमाने एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. फारूक शाह हे एक प्रभावशाली मुस्लिम नेते असून, त्यांच्या जाण्याने पक्षाची संघटनात्मक ताकद कमी झाल्याचे चित्र आहे.
![]() |
| - Advertisement - |
२०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने धुळ्यातून चांगली घोडदौड केली होती. पक्षाचे ४ नगरसेवक निवडून आले होते. मात्र फारुक शाह यांच्यामुळे स्थैर्य मिळालेला पक्ष आता त्यांच्या अनुपस्थितीत नव्याने बळकट होण्यासाठी धडपडतोय.
पुन्हा संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न
सध्या धुळे शहरात एमआयएम पक्षाने पुन्हा संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्याचाच भाग म्हणून १६ ऑगस्ट रोजी होणारा मेळावा खूपच महत्त्वाचा मानला जात आहे. काही पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी नुकतीच माजी खा. इम्तियाज जलील यांची औरंगाबाद येथे भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळेच या दौऱ्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
![]() |
| - Advertisement - |
या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याने एमआयएम पुन्हा एकदा शहरातील निवडणुकीच्या गणितात आपले अस्तित्व दाखवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये या पक्षाचा प्रभाव पुन्हा निर्माण करण्याची रणनीती तयार केली जात आहे.
आगामी निवडणूकपूर्व रंगत
महानगरपालिका निवडणुकीस अजून काही महिने अवधी असला तरीही, आतापासूनच पक्षांतर आणि नव्या समीकरणांची चाहूल लागू लागली आहे. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), मनसे व एमआयएमसारखे पक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, कोणत्या पक्षाला कोणती ताकद मिळते हे येत्या काळात स्पष्ट होईल.
धुळे शहरातील राजकारण सध्या संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. अशा परिस्थितीत १६ ऑगस्टचा मेळावा हे एक महत्त्वाचे वळण ठरू शकते. त्यामुळे या दिवशी नेमके कोण-कोण ‘एमआयएम’मध्ये प्रवेश करतात, आणि त्याचे परिणाम काय होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |
.jpeg)


