धुळे दर्पण न्यूज :-  नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नवा रंग दिला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नसताना, भुजबळांनी भूतकाळातील एक महत्त्वाची ऑफर उघड केली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  भुजबळ म्हणाले, "ज्यावेळेला नाशिकमध्ये दादा भुसे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती, त्यावेळी मला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र मी ती स्पष्ट नाकारली. माझं काम नाशिकपुरतं मर्यादित आहे. धुळे किंवा इतर कुठलाही जिल्हा मला नको. नाशिकमध्येच राहिलो तर ठीक, अन्यथा मला पालकमंत्रीपद मिळायलाच हवं, असा माझा अट्टहास नाही," असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

- Advertisement -

गोंदियाला न जाण्याचे कारण स्पष्ट

  अलीकडेच स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणाच्या निमित्तानेही भुजबळांची गैरहजेरी चर्चेत आली होती. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांना गोंदियामध्ये ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ही जबाबदारी नाकारत आरोग्य कारण पुढे केले.
  "मी 1991 पासून नाशिकमध्ये ध्वजारोहण करत आलो आहे. गोंदिया हे खूप दूर आहे, त्यासाठी नागपूरमार्गे प्रवास करावा लागतो. विमानाची सुविधा नाही, आणि त्यात तब्येतीच्या कारणास्तव एवढा लांब प्रवास माझ्यासाठी शक्य नव्हता. त्यामुळे मी दुसऱ्या कुणाला पाठवण्याचा सल्ला दिला," असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्येच ध्वजारोहण

  गोंदियाला जाण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवली. दरम्यान, भुजबळांनी 15 ऑगस्ट रोजी नाशिकमधील मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

राजकीय वातावरण तापले

  नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार असतानाही, दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्याला येथे ध्वजारोहणासाठी आणले जात असल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. नाशिकमध्ये चार-चार मंत्री असताना, बाहेरचा नेता येऊन ध्वजारोहण करतो, हा मुद्दा देखील स्थानिक पातळीवर चर्चेत आहे.
  भुजबळांच्या या विधानांमुळे आणि भूमिकेमुळे नाशिकमधील पालकमंत्रीपदाचा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात या वादाची दिशा कोणत्या राजकीय टप्प्याकडे जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू मा

ध्यम
- Advertisement -