धुळे : धुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला नव्या वळण देणारी घटना घडली आहे. शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक व तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले इरशाद जहांगीरदार यांनी अखेर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
![]() |
| -Advertisement- |
कार्यक्रमादरम्यान AIMIM पदाधिकाऱ्यांनी इरशाद जहांगीरदार यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पक्षाचा झेंडा प्रदान केला. या प्रवेशामुळे आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकांमध्ये AIMIM ला बळ मिळणार असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळांमध्ये बोलले जात आहे.
या प्रवेशामुळे धुळे शहरातील मुस्लिम समाजासोबतच इतर घटकांमध्ये AIMIM बद्दलची सकारात्मकता वाढेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी इरशाद जहांगीरदार यांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल, असे AIMIM जिल्हाध्यक्षांनी सांगितले.
धुळेतील हा प्रवेश सोहळा मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला केवळ मुस्लिम समाजातीलच नव्हे तर इतर समाजातीलही प्रतिनिधी उपस्थित होते, यामुळे आगामी काळात AIMIM चा विस्तार फक्त एका समाजापुरता मर्यादित न राहता व्यापक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, इरशाद जहांगीरदार यांचा AIMIM मधील प्रवेश हा धुळेच्या आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.



