धुळे – शहरात शनिवारी मध्यरात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला रील स्टार आणि उद्योजक शुभम सिंघवी (वय अंदाजे २५) याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागी होऊन तो घरी परतत असताना मुंबई–आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ हा अपघात घडला.

-Advertisement-

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सिंघवी हा धुळे शहरातील सहजीवन नगर भागातील रहिवासी होता. शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे विसर्जन तापी नदीपात्रात उशिरापर्यंत सुरू होते. त्यासाठी शुभम शनिवारी रात्री दुचाकीवरून नदीपात्रात गेला होता. मात्र परत येत असताना त्याच्या मोटरसायकलला भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शुभमच्या आकस्मिक जाण्याने त्याचे कुटुंब, मित्रपरिवार आणि शहरातील तरुणांमध्ये शोककळा पसरली आहे.

शुभम सिंघवी हा सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून ओळखला जात होता. इन्स्टाग्राम, फेसबुकसह विविध प्लॅटफॉर्मवर त्याच्या विनोदी व मनोरंजक रील्सना चांगला प्रतिसाद मिळत होता. त्याचबरोबर तो व्यावसायिक क्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण करत होता. उत्साही, मनमिळावू आणि सर्वांना मदतीला धावून जाणारा शुभम अकाली निधन झाल्याने धुळे शहर हळहळले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने शहरभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर शुभमला श्रद्धांजली वाहण्याचा ओघ सुरू असून, “खूप लवकर गेलास दोस्त” अशा शब्दांत मित्रपरिवाराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.