डोंबिवली (प्रतिनिधी) : केडीएमसी निवडणूक २०२६ च्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील व रवी पाटील यांना अटक केली.
भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांच्या पती ओमनाथ नाटेकर यांना पैसे वाटपाच्या आरोपावरून मारहाण झाल्याच्या घटनेनंतर दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली.
या मारहाण प्रकरणात १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नितीन पाटील आणि रवी पाटील उपचार घेत असताना पोलिसांनी रुग्णालयातून ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात हलवले.
अटकेनंतर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने तुकारामनगर परिसरात तणाव निर्माण झाला.
कायदासुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात सुमारे २०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा आरोप करत उमेदवारांच्या आरोग्याला धोका झाल्यास जबाबदारी पोलिसांची असेल, असा इशारा दिला.
दरम्यान, अटकेत असलेल्या उमेदवारांना मतदान करता येईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने निवडणूक वातावरण आणखी तापले आहे.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही बेकायदेशीर कृती खपवून घेतली जाणार नाही, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
