नांदेड (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक २०२६ च्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेस उमेदवार सारिका भालेराव यांच्या पती शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.
तीन दुचाकींवरून आलेल्या तोंड झाकलेल्या हल्लेखोरांनी बेलानगर (तरोडा खुर्द) येथील निवासस्थानाजवळ भालेराव यांच्यावर हल्ला चढवला, मात्र ते थोडक्यात बचावले.
हल्लेखोरांनी “तू प्रचार कसा करतोस, खूप भाषणं ठोकतोस; तुझी बिर्याणी करून टाकू” अशी धमकी दिल्याचा आरोप भालेराव यांनी केला.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार घटनेमागे चोरीचा प्रयत्न असल्याची शक्यता तपासात समोर आली असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि सखोल तपासाच्या सूचना देण्यात आल्या.
खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देत कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.
हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या भालेराव यांनी “आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही काय, गुन्हेगारीवर आळा कधी बसणार?” असा सवाल उपस्थित केला.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी वा हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
