महानगरपालिका निवडणूक २०२६च्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती भागात कडक गस्त वाढवली आहे.

हाडाखेड सीमा तपासणी नाका, ता. शिरपूर, जि. धुळे येथे निरीक्षक ए. पी. मते यांच्या पथकाला गुप्त बातमीद्वारे अवैध बियर वाहतुकीची माहिती मिळाली.

मालवण–पळासनेर रस्त्यावरील हेदऱ्यापाडा शिवारात सापळा रचून संशयित बोलेरो पिकअप (MH 46 BU 7158) थांबविण्यात आला.

तपासणीदरम्यान प्लास्टिक गोण्यांमध्ये भुसा भरून त्याखाली बियरचे बॉक्स लपवून वाहतूक केल्याचे आढळून आले.

वाहनातून मध्य प्रदेशात निर्मित व तेथेच विक्रीसाठी असलेली वडवायझर मॅग्नम तीव्र बिअर व पॉवर कुल स्ट्राँग बिअर (५०० मिली) अशी एकूण ७० बॉक्स जप्त करण्यात आली.

वाहनासह एकूण ८,५३,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी चालक पद्माकर कमलाकर जाधव (रा. बोराडी, ता. शिरपूर) व फरार साथीदार कमलेश सुभाष पाटील उर्फ पिंटू पाटील (रा. बोराडी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५(अ),(ई), ८०, ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपआयुक्त यू. आर. वर्मा यांच्या आदेशानुसार अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गोरख पाटील, प्रशांत बोरसे, एम. पी. म्हस्के, केतन जाधव व वाहनचालक निलेश मोरे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून पुढील तपास निरीक्षक ए. पी. मते करत आहेत.

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती देण्यासाठी टोल फ्री १८००२३३९९९९, व्हॉट्सअ‍ॅप ८४२२००११३३ किंवा दूरध्वनी ०२५६२–२९७४८४ वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.