धुळे : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील प्रकल्प सहायकाने जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारदाराकडून नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रकल्प सहायक इम्रान अब्दुल रशिद अन्सारी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी रंगेहात पकडले आहे.
या प्रकरणी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक प्रमोद रामराव पाटील याच्याविरुद्धही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने आपल्या शालकाचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी २१ जुलै २०२५ रोजी ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे येथे सादर केली होती.
सुनावणीदरम्यान सर्व कागदपत्रे जमा करूनही बराच काळ उलटून प्रमाणपत्र न मिळाल्याने तक्रारदार सातत्याने कार्यालयात पाठपुरावा करीत होता.
याच दरम्यान प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी याने काम करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली असून, त्यापैकी तीन हजार रुपये ‘फोनपे’द्वारे स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तरीही दोन महिने उलटून काम न झाल्याने पुन्हा कार्यालयात भेट दिली असता, कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील याने उर्वरित रक्कम दिल्याशिवाय काम होणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ८ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली.
पंचांसमक्ष पडताळणीत तडजोडीनंतर नऊ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाल्यानंतर १९ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली.
या कारवाईत इम्रान अन्सारी याला नऊ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून, धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळा कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले असून, सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांनी काम पाहिले आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत.
या घटनेमुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शैक्षणिक प्रवेश, नोकरी आणि विविध शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे.
प्रशासनाने अंतर्गत चौकशी करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी तसेच खासगी व्यक्तीने काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
