नाशिक — मालेगाव महापालिकेत काँग्रेसने इस्लाम पार्टीला पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला असून, यामुळे शिंदे गटाचा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न पूर्णतः उधळला गेला आहे.
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत इस्लाम पार्टीला सर्वाधिक ३५ जागा मिळाल्या असून, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) २१ आणि शिवसेना (शिंदे गट) १८ जागांवर थांबला आहे.
काँग्रेसला केवळ ३ जागा, तर समाजवादी पार्टीला ५ जागा मिळाल्याने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते.
या परिस्थितीत शिंदे गटाने एमआयएमच्या मदतीने सत्ता स्थापनेचा प्रयत्न सुरू केला होता; मात्र काँग्रेसने आज इस्लाम पार्टीला जाहीर पाठिंबा देत हा डाव निष्फळ ठरवला.
यापूर्वीच समाजवादी पार्टीने इस्लाम पार्टीला पाठिंबा दिल्याने तिन्ही पक्षांचे मिळून ४३ नगरसेवक होत असून, महापालिकेतील सत्तेचा प्रश्न जवळपास निकाली निघाला आहे.
अल्पसंख्य जागा असूनही एमआयएम आणि शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ही रणनीती आखल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
दरम्यान, स्थिर प्रशासनाच्या दृष्टीने इस्लाम पार्टीकडून एमआयएमशीही चर्चा सुरू असून, या संदर्भात आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेण्यात आल्याची माहिती आहे.
एमआयएम पाठिंबा देणार की विरोधी बाकावर बसणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या चाव्या इस्लाम पार्टीकडे गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाने संपर्क साधल्याचा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती.
हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिंदे गटाने एमआयएमशी हातमिळवणीचा प्रस्ताव दिल्याची बाब समोर आल्यानंतर या घडामोडींना आणखी वेग मिळाला आहे.
